पंजाब : शेतकऱ्यांना मिळणार प्रति क्विंटल ४१६ रुपये ऊस दर

चंदिगढ : पंजाब सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना उसाच्या खरेदी दरात प्रति क्विंटल १५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील उसाचा दर आता प्रति क्विंटल ४१६ रुपये होईल. गेल्यावर्षीच्या ४०१ रुपयांपेक्षा हा दर १५ रुपयांनी जास्त आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुदासपूरमधील दिनानगर येथे एका नवीन साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली. हरियाणा सरकारने यावर्षी उसाचा दर प्रति क्विंटल ४१५ रुपये निश्चित केला. त्यापेक्षा एक रुपया जास्त दर देऊन, पंजाबने हरियाणावर आघाडी घेतली आहे. पंजाबने ठरवलेला हा दर देशात सर्वाधिक आहे , असा दावा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला.

मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, गुरुदासपूर साखर कारखान्याची क्षमता वाढवल्याचा शेतकऱ्यांना फायदा देईल. कारखान्याची क्षमता २,००० टीडीसीवरून ५,००० टन करण्यात आली आहे. सध्या या कारखान्याला २,८५० शेतकरी ऊस पुरवतात, परंतु प्रकल्प सुरू झाल्यानंतर ही संख्या ७,०२५ पर्यंत वाढेल. यामुळे शेतकऱ्यांना दूरच्या कारखान्यामध्ये जाण्याची गरज कमी होईल. यातून वाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही वाचतील. सरकार ऊस पिकाची गुणवत्ता देखील सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. उसाचा दर ४१६ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे, जो देशातील सर्वाधिक आहे. सध्या सुरू असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष केंद्र सरकारशी संबंधित मागण्यांशी संबंधित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here