राहुरी : येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी सत्ता असलेल्या भाजपने तिरंगी लढतीमधून माघार घेतली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. त्यासाठी ३१ मे रोजी मतदान होत आहे. शेतकरी संघटनेची भूमिका सध्यातरी शांत दिसत आहे. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल आहे. अरुण तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे बंधू व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते आहेत. राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष व कारखान्याची बऱ्याच काळ सत्ता राहिलेले स्व. रामदास पाटील धुमाळ यांचे पुतणे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमृत धुमाळ पाटील यांच्या पॅनेलचे १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एक अपक्ष उमेदवार आहे. कारखान्यावर कोणाची सत्ता येतेय याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
तनपुरे कारखान्यावर बहुतांश काळ स्व. रामदास पाटील धुमाळ तसेच तनपुरे यांची सत्ता राहिलेली आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु हे प्रयत्न फोल ठरले. गेल्यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्यावर सत्ता आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे हे निवडणुकीत उतरतील अशी शक्यता होती. मात्र ते आणि शेतकरी संघटना या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. आर्थिक स्थिती बिघडल्याच्या कारणाने सध्या काही वर्षांपासून हा कारखाना बंदच आहे. ज्यांची सत्ता येईल त्यांना पुन्हा हा कारखाना सुरू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.












