राहुरी : राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक ३१ मे रोजी होत असून या पार्श्वभूमीवर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी तिन्ही पॅनल प्रमुखांना कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मी नारायण मंदिरात भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी राहुरी बाजार समितीचे सभापती तथा जनसेवा मंडळाचे प्रमुख अरुण तनपुरे यांनी हा कारखाना सुरू करण्याचे शिवधनुष्य मी उचलले असून कारखान्याचा बॉयलर पेटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सभासद व कामगारांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.
अरुण तनपुरे यांनी कामगारांपुढे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, डॉ. बाबुराव तनपुरे यांनी सुरू केलेल्या संस्था उर्जितावसस्थेत आणण्यासाठी मी तनपूरे परिवाराचा सदस्य या नात्याने पुढे आलो आहे. कारखान्याचे तनपुरे परिवाराशी भावनीक नातं आहे. सभासद व नेत्यांना वाऱ्यावर न सोडण्याची भूमिका आमची आहे. काही झाले तरी हा कारखाना सुरू करायचा ही माझी धारणा आहे. त्यासाठी सभासद व कामगारांनी साथ द्यावी. युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, सेक्रेटरी सचिन काळे, अर्जुन दुशिंग, इंद्रभान पेरणे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे आदींसह युनियनचे पदाधिकारी व कामगार बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.