पुणे : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात आणि विशेषत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले. शेतजमीन तळ्याच्या स्वरूपात बदलली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी शेतीची मशागत करणे कठीण झाले आहे. परिणामी, आगामी लागवड हंगामात उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीची पाहणी केली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रसामग्रीने मशागत करणे सध्या अशक्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ऊस लागवड हंगामात किमान पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ प्रतिसाद देत सोमेश्वर, छत्रपती आणि माळेगाव या तीनही सहकारी साखर कारखान्यांना ऊस लागवड हंगाम पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये पूर्वी १ जुलै दरम्यान असणारा लागवड कालावधी आता १५ जुलैपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक मशागत करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल आणि योग्य वेळी लागवड करता येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अशावेळी मिळणारी मुदतवाढ त्यांच्यासाठी दिलासा ठरणार आहे.