सांगली : ऊस शेतीसाठी वरदान ठरत असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविणार आहोत. यासाठई ‘व्हीएसआय’ (पुणे) व कृषी विज्ञान केंद्र (बारामती) या संस्थांशी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडून करार प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. बारामती येथे एआय तंत्रज्ञानाने केलेली ऊस शेती पाहण्यास प्रगतशील शेतकऱ्यांना पाठवत आहोत. कारखान्याच्या वतीने भागाभागांत ‘वेदर स्टेशन’ उभाणार असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ‘सेन्सॉर पॉईंट’ बसवून घ्यायचे आहेत, अशी माहिती राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला. रेठरेधरण व वाटेगाव (ता. वाळवा) येथील सभासद संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते. त्यांनी नायकलवाडी, ओझर्डे, घबकवाडी, जांभूळवाडी, भाटवडे, काळमवाडी, शेणे, सुरूल आदी गावांचा सभासद दौरा पूर्ण केला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष प्रतीक पाटील म्हणाले की, राजारामबापू कारखाना कार्यक्षेत्रात अधिकाधिक क्षेत्र एआय तंत्रज्ञानाच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न आहे. गावातील पाणंद रस्त्यांचा अर्ज द्यावा, पाहणी करून जे आवश्यक आहे, ते करूया. एआय तंत्रज्ञानाने परिसरात शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडेल. कारखान्याचे संचालक देवराज पाटील, अतुल पाटील यांची भाषणे झाली. रवींद्र बर्डे यांनी ऊसतोडीसह विविध दुरुस्त्या सुचविल्या. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सचिव डी. एम. पाटील, जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील सहभागी झाले होते. वाटेगाव येथे माजी सभापती रवींद्र बर्डे, सरपंच नंदा चौगुले, प्रकाश पाटील, राजीव बर्डे, सुवर्णा जाधव, रेठरेधरण सरपंच हर्षवर्धन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शामराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.