मुंबई : सध्या महागाई कमी होण्याची शक्यता दिसत नसल्याची स्थिती आहे. अशातच भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, बुधवारी पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी तसे संकेत दिले होते. गेल्या महिन्यात आरबीआयने रेपो दरात ०.४० टक्के वाढ केली होती. आणि आता या महिन्यात पुन्हा ०.५० टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. या वाढीनंतर पुन्हा एकदा ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.
नवभारत टाइम्समधील वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेकडून यावेळी रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्स म्हणजे ०.५० टक्के वाढ करण्यात आली आहे. रेपोट रेट वाढविण्याचा थेट परिणाम म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून बँकांना मिळणाऱ्या कर्जाचे दर महाग होईल. अर्थात या वाढीनंतर बँका याचा भार ग्राहकांकडे हस्तांतरीत करतील. त्यामुळे जर तुमचे होम लोन असेल तर त्याच्या ईएमआयमध्येही वाढ होताना दिसून येईल. ज्या लोकांनी बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट केले असेल, त्यांना याचा फायदा होईल. एफडीच्या दरातही वाढ होणार आहे. घाऊक महागाईचा दर एप्रिल महिन्यात सातत्याने सातव्यांदा वाढला असून आठ वर्षांच्या उच्चांकी स्थितीत, ७.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध हे यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे इंधनासह अनेक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक महागाईवर आधारीत महागाईचा दर १३ महिन्यांपासून दुहेरी अंकात आहे. एप्रिल महिन्यात १५.०८ टक्क्यांचा उच्चांकी स्तरावर हा दर पोहोचला होता. काही महिन्यांपूर्वी दास यांनी सांगितले की, रेपो दरात वाढ केली जाईल. मात्र, ती किती असेल याची निश्चित माहिती आताच देता येणार नाही.












