चंदीगड : पंजाब सरकारने गेल्या ऊस गळीत हंगामातील थकीत ६७९.३७ कोटी रुपयांची थकीत बिले अदा केल्याची माहिती अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी दिली. राज्यातील नऊ सहकारी कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या १८,७७१ शेतकऱ्यांना या बिलांचा फायदा होणार आहे. साखर कारखान्यांच्यावतीने या हंगामात एकूण १९४.६६ लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आला होता, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
अर्थमंत्री हरपाल चीमा म्हणाले की, शेतकऱ्यांची एकूण थकबाकी ७७९.८६ कोटी रुपये होती. प्रति क्विंटल ४०१ रुपये यानुसार ही बिले जारी करण्यात आली आहेत. यासंदर्भातील केंद्रीय मदत मिळाल्यानंतर उर्वरित १००.४९ कोटी रुपये देखील लवकरच दिले जातील. आतापर्यंत ८७ टक्क्यांहून अधिक पेमेंट झाले आहे, असे अर्थमंत्री म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, नऊ सहकारी साखर कारखान्यांपैकी अजनालासाठी १० मार्च, बटालासाठी १८ मार्च, भोगपूरसाठी २७ मार्च, बुधेवालसाठी १३ मार्च, फाजिल्कासाठी १ मार्च, गुरुदासपूरसाठी २५ मार्च, मोरिंडासाठी ३० मार्च, नवांशहरसाठी ३१ मार्च आणि नाकोदरसाठी २२ फेब्रुवारीपर्यंतच्या ऊस खरेदीची थकीत बिले देण्यात आली आहे.