पुणे : देशात २०२३ मध्ये साखर उत्पादन कमी झाले होते. मागील हंगामात गाळपासाठी उसाची उपलब्धता कमीच होती. मात्र यंदा देशात उसाची लागवड वाढली आहे. मागील हंगामात देशात ५५ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती, तर यंदा ५७ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामात उसाची उपलब्धता अधिक राहील. परिणामी देशातील साखर उत्पादनातही वाढण्याची शक्यता आहे. याचा सर्वंकष विचार करून केंद्र सरकार नव्या हंगामात साखर निर्यातीवरील सर्व बंधने उठवू शकते, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
चालू हंगामात केंद्र सरकारने केवळ १० लाख टन साखर निर्यातीलाच परवानगी दिली. पण आता नव्या हंगामात देशातील साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. देशात साखरेचा साठा जास्त होणार असल्याने नव्या हंगामात सरकार साखर निर्यात खुली करण्याची शक्यता आहे. सद्स्थितीत महाराष्ट्रासह महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये यंदा लागवड वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता साखरेच्या दरावर आधीच दबाव आहे. मात्र, भारताने जागतिक बाजारात निर्यात सुरू केल्यास त्याचा बाजारावर आणखी दबाव येईल. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती कमी असल्याने निर्यातही वेगाने होण्याची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे संयुक्त सचिव अश्विनी श्रीवास्तव यांनी आगामी गाळप हंगामात साखर निर्यातीला वाव असेल. पण, नेमकी किती साखर निर्यात केली जाऊ शकते, याबाबत स्पष्टता आलेली नाही असे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.