नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे संशोधन केवळ बारामती आणि महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या माध्यमातून त्याच्या विस्ताराची सुरुवातही झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे संशोधन केवळ महाराष्ट्रातील उस शेतीपुरतेच मर्यादित नसून ते देशातील सर्व प्रकारची पिके, फळ बागायती आणि भाजीपाल्यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे, असे प्रतिपादन बारामतीच्या कृषी विकास ट्रस्टचे विश्वस्त आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.
दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमधील सहकारी साखर उद्योग संमेलनात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा उस शेतीमधील वापर’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे असिस्टंट डायरेक्टर जनरल (क्रॉप सायन्स) डॉ. प्रशांत कुमार दास होते. महाराष्ट्रात ऊस उत्पादन हे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असल्यामुळे त्याचा प्रभाव व्यापक ठरणार आहे. भारतातील कुठल्याही शेतकऱ्याला किमान एक लाख रुपये प्रति एकर उत्पन्न मिळावे, असा आमचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.
प्रतापराव पवार म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने उसाचे उत्पादन ६० ते शंभर टक्के वाढू शकते हे एक हजार शेतकऱ्यांच्या सहभागातून साधलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले. त्यामुळे उसाचा उतारा २ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर खतांवरील खर्च किमान ४० टक्क्यांनी, तर पाण्याचा वापर किमान ४० टक्क्यांनी, तर विजेचा वापर किमान ३० टक्क्यांनी घटला असून, कीटकनाशकांचाही वापर कमी होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे महाराष्ट्रातील पीक पद्धती बदलण्यास मदत होणार असून, त्यासाठी एक वर्ष पुरेसे ठरेल. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या समस्यांशी निगडित सर्व मुद्यांचा परामर्श घेऊन त्यांचा या संशोधनात समावेश करण्यात आला आहे.
पवार म्हणाले, देशातील शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान सर्व भाषांमध्ये उपलब्ध असेल. या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार ते अडीच लाखादरम्यान वाढू शकते. यावेळी आयसीएआर, शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, कोईमतूरचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्लीचे चीफ केन अॅडवायझर डॉ. डी. बी. डौले उपस्थित होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत केले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने डॉ. योगेश फटाके आणि डॉ. विवेक भोईटे यांनी सादरीकरण केले.