अहमदनगर : राहुरीतील डॉ. बा.बा. तनपुरे कारखान्यावर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने कर्ज थकबाकीमुळे जप्तीची कारवाई करण्यात आली. आता बँकेकडून कारखाना पंधरा वर्षांवर भाडेतत्त्वावर देण्याबाबत ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला असला तरी आगामी गाळप हंगाम होणार कि नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारखाना बंद पडल्याने शेकडोन कामगार आणि हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
कारखान्यावर शासनातर्फे प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेतर्फे कारखान्याची मालमत्ता पुन्हा जप्त करण्यात आली. गेल्यावर्षी कारखाना बंद पडला. आगामी गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यताही धूसर झाली आहे. त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढतच चालली आहे. याच अनुषंगाने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 28 ऑगस्ट 2023 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठीचा ठराव संचालक मंडळाने मंजूर केला.












