सांगली : वाढत्या महागाईमुळे शेती करणे जिकीरीचे बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात उसाचे जादा उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले. कारखान्याकडून यंत्राद्वारे बाळ भरणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुणअण्णा लाड होते.
यावेळी शरद लाड म्हणाले, बाळभरणी हे महत्वाचे आंतरमशागतीचे काम आहे. बाळभरणी केल्यामुळे उसाच्या फुटव्यांची संख्या वाढते. त्यामुळे एकरी सहा ते सात टन उत्पादन वाढ होते. सध्या बाळभरणीचे काम बैलचलित किया ट्रॅक्टरचलित औजाराने केले जाते. मात्र, बैलजोडीची कमतरता व ट्रॅक्टरमुळे जमिनीचा बाढत असलेला घट्टपणा यावर पर्याय म्हणून एका व्यक्तीकडून चालवणे जाणारे व वजनाने हलके असे हे यंत्र फायद्याचे ठरेल, असेही ते म्हणाले. यावेळी उत्कर्ष भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, नितीन नवले, संचालक पी, एस. माळी, शीतल बिरनाळे, दिलीप धोरबोले, अनिल पवार, अशोक विभुते, संदीप पवार, कुंडलिक थोरात, बबन पाटील, सुरेश पाटील, संतोष गुरव, संदीप जगदाळे उपस्थित होते.















