सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या खात, प्रसंगी अंगावर गुन्हे दाखल करुन घेत ऊस दरासाठी आक्रमक आंदोलन केले. याचे फलित म्हणून शेतकऱ्यांना प्रतिटन तीनशे रुपयांपासून ते आज साडेतीन हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते म्हैसाळ (ता. मिरज) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, सरपंच रश्मी शिंदे-म्हैसाळकर, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, पोपटराव मोरे, माजी सरपंच आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, माजी उपसभापती दिलीपकुमार पाटील, वसंत सोसायटीचे अध्यक्ष महावीर पाटील, पिरगोंडा पाटील, रावसाहेब पाटील, सुधाकर पाटील उपस्थित होते. शेट्टी म्हणाले की, सन १९९० पासून आजतागायत आपण ऊस दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहे. यातून उसाची दरवाढ झालेली आहे. उसाचा दर तीन हजारांवर थांबला होता. आंदोलनाचे हत्यार उपसताच जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत बैठका घेतल्या. परिणामी एकरकमी एफआरपी देण्यासाठी संघटनेने कारखानदारांना भाग पाडले. शेतकरी हिताच्या या लढ्यात सर्व शेतकऱ्यांना सोबत येण्याचे आवाहन यावेळी शेट्टी यांनी केले.
सांगली जिल्ह्यात दर कमी का…?
कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखाना कोणतेही उपपदार्थ उत्पादन न करता देखील ३६५३ इतका दर देतो. आपल्या सांगली जिल्ह्यातील कारखानदार मात्र ३४०० रुपयांच्यावर जायला तयार नाहीत, हे का होत आहे. तर शेतकरी संयम ठेवत नाहीत. शेतकऱ्याला कधी एकदा रान मोकळे करुन ऊस घालवू, असे होत असते. यामुळेच कारखानदारांचे फावत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. चळवळीला अजूनपण सर्वसमावेशक पाठिंबा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी स्वतः वजन करुन ऊस पाठवावा..
शेतकऱ्यांनी केवळ ऊस पिकवून उपयोग नाही तर, त्याच्या योग्य वजनावर लक्ष दिले पाहिजे. अनेक कारखानदार धडधडीत काटामारी करत असतात. यामुळे स्वतः वजन करुनच ऊस कारखान्याला पाठविला पाहिजे. शेतकऱ्यांनी जे विकते ते पिकवले पाहिजे. अनेक कारखानदारांनी रिकव्हरी चोरी सुरू केली आहे. कर्नाटकातून कमी दराने ऊस खरेदी करुन आपल्याकडे जादा दराने विकून ते मोठे भांडवलदार होत आहेत.
शिवाचार्य महास्वामी, महेश खराडे, संदीप राजोबा, पोपटराव मोरे, प्रा. भरतेश्वर पाटील, तानाजी चव्हाण, डॉ. बी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. तात्यासो चौगुले, धनराज शिंदे-म्हैसाळकर, मेघराज शिंदे-म्हैसाळकर, नरसगोंडा पाटील, शिवलिंग सनबे, अभय कबुरे, संजय लिबिकाई, भरत चौगुले उपस्थित होते. सूत्रसंचालन मुबारक सौदागर यांनी केले.


















