सातारा : सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील जाहीर प्रचार सभांच्या तोफा आज थंडावल्या. तब्बल २५ वर्षांनी तिरंगी निवडणूक होत असल्याने यावेळी मतदान चुरशीने होण्याची चिन्हे आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता झाली. तिन्ही पॅनेल प्रमुखांच्या आजच्या सांगता सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्या. तिन्ही सभांना मतदार आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सह्याद्री साखर कारखान्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलची मसूरला, आमदार मनोज घोरपडे आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलची उंब्रजला आणि काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलची मसूर येथे प्रचार सांगता सभा झाली. तिन्ही सभांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तिन्ही सभांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.











