कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ई-लिलावाद्वारे होणारी विक्री प्रक्रिया रद्द झाली आहे. दिल्लीतील थकबाकी वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) सोमवारी आदेश दिला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीच्या वसुलीपोटी ‘दौलत’ कारखाना ३९ वर्षांच्या मुदतीने ‘लिव्ह अँड लायसन्स’ या भाडेतत्त्वावर जिल्हा बँकेसह इतर सर्व वैधानिक देणी १६२ कोटी ही अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने देण्याच्या अटीवर चालवावयास दिला. याबाबत बँक, कंपनी व ‘दौलत’ कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता.
या भाडेकरारात नमूद केलेल्या वैधानिक देण्यांपैकी साखर विकास निधी (एसडीएफ) ची देय १८.८ कोटी व त्यावरील व्याजासह होणाऱ्या रकमेच्या वसुलीसाठी राष्ट्रीय सहकार विकास प्राधिकरणाने (एनसीडीसी) हा कारखाना ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्याची निविदा २३ ऑगस्टला काढली. त्यानुसार गुरुवारी (दि. ९) लिलाव होता. या लिलाव प्रक्रियेला स्थगिती मिळावी म्हणून ‘अथर्व’ कंपनीने दिल्लीतील थकबाकी वसुली लवाद डीआरटी कोर्टामध्ये अपील केले होती.
या अपिलामध्ये बँकेच्यावतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रीती भट्ट यांनी बाजू मांडली. अवलोकनानंतर डीआरटी न्यायालयाने केडीसीसी बँकेने ‘दौलत’ कारखाना चालवण्याबाबत केलेला भाडेकरार हा योग्य असल्याचे नमूद केले. तसेच बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट-२००२ अंतर्गत राबविलेली प्रक्रिया योग्य असल्याचेही निरीक्षण नोंदविले. तसेच कारखान्याचा हा भाडेकरार एनसीडीसीला ज्ञात होता, असे नमूद करतानाच कोर्टाने तब्बल सहा वर्षांनंतर ही बाब उपस्थित करता येणार नाही, हा करार रद्द करण्याचा अधिकार वसुली अधिकाऱ्यांना नाही, तो दिवाणी न्यायालयाला आहे, असेही न्यायालयाने नमूद केल्याचे बँकेने पत्रकात म्हटले आहे.
जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेतही झाली होती चर्चा…
जिल्हा बँकेच्या महिन्यापूर्वी झा/लेल्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी बँकेच्या वतीने अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी करारानुसार एनसीडीसीची सर्व देणी भागविण्याची जबाबदारी अथर्व इंटरट्रेड कंपनीची आहे. या कंपनीने ही देणी न भागविल्यास ही रक्कम केडीसीसी बँक स्वतः भरेल आणि दौलत साखर कारखाना हा जीवनभर शेतकरी सभासदांच्या मालकीचाच राहील, असा दिलासा दिला होता. या निर्णयाने मुश्रीफ यांनी दिलेला शब्द पाळला.
दौलत कारखाना हा शेतकाऱ्यांचाच राहणार : मानसिंग खोराटे
याबाबत अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले की, दौलत कारखाना हा शेतकाऱ्यांचाच राहणार आहे. दौलत कारखाना आणि परिसरातील हजारो शेतकाऱ्यांचा विकास याला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही आमची ही बांधिलकी कायम राहील. दौलत 39 वर्षे माझ्याकडे राहणार असून तोपर्यंत दौलतचा मी लिलाव होऊ देणार नाही किंवा त्याची विक्री होऊ देणार नाही. दौलत हा शेतकरी संभासदांचाच राहील आणि 39 वर्षानंतर वाढीव क्षमतेसह अत्यंत सुस्थितीत मी हा कारखाना सभासदांकडे सोपवणार आहे.