संभाजीनगर : साखर कारखान्यांनी २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचा दुसरा व अंतिम हप्ता येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, ऊस तोडणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतावर उसाची रिकव्हरी तपासणी करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले. कारखान्यांनी चालू हंगामात गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल किमान ४००० हजार रुपये देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनानुसार, उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस ऑनलाइन काटा किंवा बाहेर खाजगी वजन काट्यावर वजन करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच मागील वर्षी २०२४-२५ मधील तक्रारदार शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा. यावर्षी खरीप हंगामातील अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्या पध्दतीने पीक विमा लागू करून देण्यात यावा, गोवंश हत्या बंदी कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवाजी पेटे, तालुकाध्यक्ष गुंडेराव चौसष्टे, बालाजी महाराज पाटील, नागनाथ वनकुद्रे, तुकाराम कोकरे, सचिन म्हाके, मधुकर जळकोटे, अब्दुल मुजेवार, नर्सिंग कामगुंडा आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.