सांगली : गेल्यावर्षी, २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे. कर्नाटकमधील साखर कारखाने सुरू झाल्याने जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार, दि. २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तर साखर कारखान्यांनी ३,७५१ रुपये दर जाहीर करावा आणि मगच गाळप सुरू करावे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. दरम्यान, एकाही साखर कारखान्याने ऊस दराबाबत भूमिका लगेच जाहीर करू नये असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे सीमाभागातील कारखानदार हवालदिल झाले आहेत. कर्नाटकमधील कारखाने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील ऊस उचलतात. त्यामुळे उसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार ते पाच दिवस आधीच जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी कंबर कसली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी ३८०० रुपये क्विंटलने झालेली आहे. इथेनॉल, बायोगॅस, मळी, अल्कोहोल यांसह इतर उप पदार्थांनाही चांगला भाव मिळाला आहे. यामुळे गत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात ३,७५१ रुपये मिळाले पाहिजेत.












