सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर्स कारखान्यााला ऊस वाहतुकीसाठी वाहने आणि कामगार पुरवतो, असे सांगून ३.८१ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील १४, बीड जिल्ह्यातील ४, सोलापूर जिल्ह्यातील ६, धाराशिव आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी ३, वाशीम आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ३२ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कारखान्याचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
संशयितांनी नागेवाडी कारखान्याच्या कार्यालयात येऊन ‘आम्ही तुम्हाला ऊस वाहतुकीसाठी वाहने आणि कामगार पुरवतो’ म्हणून स्वतः च्या बँक खात्यावर व रोख स्वरूपात एकूण ३ कोटी ८१ लाख ५५ हजार २०० रुपये कारखान्याकडून नेले. मात्र आजअखेर कोणत्याही प्रकारे वाहन व कामगार न पुरवता कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे, असे मोहिते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कारखान्याची २३ जून २०२३ पासून आतापर्यंत फसवणूक झाल्याचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत गोरखनाथ गोपणे, दामाजी कोळेकर, बाळू माने, रामू बिळूर, बबन कोळेकर (सर्व रा. करेवाडी), सुखदेव करे, पाटलू तांबे, अरुण लोहार, आकाश बिळूर (सर्व रा. तिकोंडी), संभाजी गडदे, (रा. पांडोझरी), कृष्णात पाटील (रा. निंबळक), भानुदास पाटील, अक्षय बजरंग पाटील आदींचा यात समावेश आहे.