सांगली : राजारामनगर येथे राजारामबापू साखर कारखाना, केव्हीके बारामती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्यातर्फे ‘ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, ‘व्हीएसआय’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कपिल सुशिर, उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, तसेच मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील उपस्थित होते. आपल्या कारखान्यातून ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. प्रत्येकी २५ शेतकऱ्यांचे गट करून ५ किलोमीटरच्या परिघात हवामान केंद्र उभारले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात उत्पादन वाढविणे शक्य असल्याचा विश्वास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कृत्रिम बुद्धिमत्ता कृती गटाचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील म्हणाले, “एआय’ तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक गतीने व्हावा, यासाठी कारखान्याकडून प्रत्येक गटावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. तसेच राज्यातील ज्या ठिकाणी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला आहे, तेथे शेतकऱ्यांना भेट देण्याची संधी दिली जाईल. एआय तंत्रज्ञान वापरात सेन्सॉर तंत्रज्ञानाद्वारे जमिनीची आर्द्रता आणि तापमान समजून अचूक पाणी व्यवस्थापन करता येईल. उपग्रहांच्या मदतीने रोग, कीड आणि अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून योग्य उपाययोजना सुचवली जाईल. तर डॉ. कपिल सुशिर यांनी “राजारामबापू कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून ‘एआय’ प्रणालीचा स्वीकार मोठ्या उत्साहाने होत आहे” अशी माहिती दिली. राजारामबापू साखर कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असे ते म्हणाले. यावेळी प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.