सांगली : डफळापूर-कुडणूर येथील श्रीपती शुगर अॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने यंदाच्या हंगामात ४ लाख ३९ हजार ११ टन उसाचे गाळप केले. कारखान्याने ५ लाख १८ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा ११.८० टक्के नोंदविला आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. यानिमित्त कारखाना परिसरात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. यंदा उत्कृष्ट गाळप केल्याबद्दल कारखान्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना १५ दिवसांच्या पगाराएवढे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांनी केली.
यावेळी कार्यकारी संचालक लाड म्हणाले, “कारखान्याने आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा समाधानकारक गाळप केले आहे. येत्या गळीत हंगामात कारखान्याची गाळप क्षमता पूर्ण क्षमतेने वापरून दररोज ५ हजार टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच उपपदार्थ निर्मितीसाठी इथेनॉल उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचा मानस आहे. गेल्या तीन हंगामांमध्ये सातत्याने चांगला दर देऊन शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा केली असून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात कारखाना यशस्वी ठरला आहे. यावेळी ‘भारती शुगर्स’चे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड, सरव्यवस्थापक महेश जोशी, मुख्य अभियंता यशवंत जाधव, मुख्य रसायनी दीपक वाणी, एचआर व्यवस्थापक रणजित जाधव, शेती अधिकारी सतीश मिरजकर, आनंदा कदम, माणिक पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


















