सांगली : जिल्ह्यात ७९ लाख टन उसाचे गाळप, १०.६७ टक्के साखर उतारा

सांगली : जिल्ह्यात नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामामध्ये जवळपास १ लाख ३८ हजार ९०२ हेक्टर ऊसक्षेत्र उपलब्ध होते. हा ऊस वेळेत गाळपाचे कारखान्यांसमोर आव्हान होते. पण यावेळी मेपासूनच सलग सात-आठ महिने पावसामुळे गोंधळ उडाला. कारखान्यांचे हंगाम सुरू झाले तरी सततच्या पावसाने ऊस शेतीचे कमालीचे नुकसान झाले होते. याचा एकरी किमान २५ ते २० टन कमी उतारा निघून फटका बसला. चालू हंगामात सोळा साखर कारखान्यांनी ७९ लाख ९९ हजार १२१ टन उसाचे गाळप केले असून ८४ लाख ५७ हजार ४५५ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. या साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा १०.५७ टक्के राहिला. कमी कालावधीमुळे साखर कारखाने अधिकच अडचणीत आले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने याची दखल घेऊन तातडीने कारखान्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे, असे मत राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी व्यक्त केले.

यावर्षी जिल्ह्यातील कारखान्यांबरोबरच परजिल्ह्यातील कृष्णा, वारणा, सह्याद्री, शरद, बांबवडे – शाहूवाडी या कारखान्यांनादेखील जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी गेला. हंगामात डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून या ठिकाणी ९ लाख ७३ हजार ४१ टन उसाचे गाळप करत ८ लाख ५२ हजार ५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिटने आघाडी घेतली. त्यांचा उतारा १२.५३ टक्के आहे. जिल्ह्यातील १० सहकारी साखर कारखान्यांनी ५६ लाख ७३ हजार ४८९ टन उसाचे गाळप केले असून ६० लाख ५६ हजार १०५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांचा साखर उतारा १०.६७ टक्के राहिला आहे, तर ६ खासगी साखर कारखान्यांनी हंगामात २३ लाख २५ हजार ६३१ टन उसाचे गाळप केले असून २४ लाख १ हजार ५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा १०.३३ टक्के राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here