सांगली : राजारामबापू साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल युनिटचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया पाटील यांच्या हस्ते पार पडला. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, “आपण सर्वांनी ताकद लावल्यास कारखान्याच्या सर्व चार युनिटमध्ये मिळून २० लाख टन उसाचे गाळप सहजशक्य आहे. वाटेगाव-सुरूल युनिट पूर्ण क्षमतेने चालविल्यास सुमारे ४ लाख ८० हजार टन ऊस गाळप करता येईल आणि १२.५० टक्के साखर उतारा मिळवता येईल.”
देवराज पाटील म्हणाले, यावर्षी निश्चित उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार करून कामाला लागा. शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देत निर्णय घेतले जातील. अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी सभापती रवींद्र बर्डे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, चिफ इंजिनिअर संताजी चव्हाण, चिफ केमिस्ट संभाजी सावंत, कामगार नेते राजेंद्र चव्हाण यांच्यासह संचालक, अधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर. डी. माहुली यांनी स्वागत केले. विजयराव पाटील यांनी आभार मानले. साखर राजारामबापू कारखान्याच्या तिप्पेहळ्ळी-जत युनिटचे बॉयलर अग्निप्रदीपनही संचालक रामराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या युनिटमध्ये ३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून जनरल मॅनेजर विजय मोरे, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, चिफ केमिस्ट नंदकिशोर जगताप यांच्यासह शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.