सांगली : रेठरे हरणाक्ष येथे नुकताच शेतकरी संवाद मेळावा झाला. त्यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कृष्णा सह. बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे होते. अध्यक्ष डॉ. भोसले यांनी, केंद्र सरकारच्या सहकार विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या शेती पाणी पुरवठा योजनेतून कृष्णा साखर कारखान्याच्या लिफ्ट इरिगेशन योजनांची नव्याने उभारणी करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार आहेत अशी घोषणा केली.
या संवाद मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचा, पहिल्यांदा ३५०० रुपये भाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांची दीपावलीही गोड करावी, मागणी केली. यावेळी अध्यक्ष डॉ. भोसले यांनी सध्या सहकारी कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी अडचणींचा सामना करत आहे. मजुरी, पाणी, खते यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. यातून मार्ग निघावा यासाठी साखरेचे दर वाढले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक अविनाश खरात, जितेंद्र पाटील, लिंबाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक जे. डी. मोरे यांनी स्वागत केले. धैर्यशील मोरे यांनी आभार मानले.

















