सांगली : मागील काही वर्षांचा अनुभव विचारात घेऊन चिखलहोळच्या शेतकऱ्यानी ऊस तोडणी, वाहतुकदारांकडून केल्या जाणाऱ्या पैशांच्या मागणीबाबत ठोस भूमिका घेतली आहे. मजुरी, तसेच वाहतूकदार हे करत असलेली रोख रकमेची मागणी विचारात घेत त्यातील अवास्तव मागणी बाजूला सारण्याचा आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्याचा निर्णय गावातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला. सरपंच नारायण माळी यांच्या अध्यक्षतेखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. आतापासून ऊस तोडणी हंगाम संपेपर्यंत प्रतिएकरी २००० रुपये ऊस तोडणी मजुरी देण्यात येईल. ऊस यंत्राद्वारे तोडण्यात येणार असेल. त्यावेळी त्या पथकास एकरी एक हजार रुपये देण्यात येतील असे ठरले.
याबाबत सरपंचांनी सांगितले की, आम्ही घेतलेल्या मागणीबाबत सविस्तर पत्र आणि ठराव संबंधित सर्व कारखाने, त्यांचे व्यवस्थापक, अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात देण्यात आला आहे. ऊस वाहतुकीसंदर्भात दोन ‘अंगद’च्या एक फेन्यासाठी दोनशे रुपये प्रतिफेरा आणि जेवणाचा डब्बा किंवा ३०० रुपये, चारचाकी ट्रेलर असल्यास ३०० रुपये प्रतिफेरा प्रवेश आणि जेवण किंवा डब्बा नाही दिल्यास ४०० रुपयांप्रमाणे संपूर्ण हंगामासाठी मोबदला देण्यात येईल. ऊस तोडणी मजूर किंवा वाहतूकदारांनी यापेक्षा जास्त मागणी करू नये. एखाद्या शेतकऱ्याने ज्यादाची ऊस तोडणी मजुरी किंवा वाहतूक देण्याचे आमिष दाखवल्यास आणि तसे बैठकीमध्ये ठरलेल्या समितीस निदर्शनास आल्यास संबंधित शेतकरी किंवा ऊस तोडणी टोळी विरुद्ध सभेत ठरल्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.












