सांगली : आरळा येथील डालमिया भारत शुगर (निनाईदेवी युनिट) कारखान्याने कारखान्याने ३२०० रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच शेतकऱ्यांना दिला आहे. गेल्या हंगामातील उसाला प्रतिटन १४७ रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे. आजअखेर एकूण कारखान्याने ३३४७ रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे, असे कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी सांगितले. गत हंगामातील उसाचा दुसरा हप्ता देणारा डालमिया (निनाईदेवी) कारखाना जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे.
खरिपाच्या टोकणी, पेरणीच्या तोंडावर डालमियाने दुसरा हप्ता दिल्याने शेतकऱ्यांतून याचे स्वागत होत आहे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस शेतकऱ्यांनी डालमिया कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी युनिट हेड कुंभार यांनी केले. यावेळी उपसरव्यवस्थापक सुधीर पाटील, एच. आर. हेड महेश कवचाळे उपस्थित होते. दरम्यान, डालमिया कारखान्याने गत हंगामातील उसाला प्रतिटन १४७ रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता दिला. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी दुसरा हप्ता दिलेला नाही. कोणतेही इतर प्रकल्प नसताना डालमिया जादा दर देत असेल, तर इतर कारखाने का देऊ शकत नाहीत? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे प्रकल्प, उपपदार्थ बाजारात असून देखील दुसरा हप्ता ते का देऊ शकत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.