सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष बी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कारखान्याच्या डिस्टिलरीची क्षमतावाढ, तसेच लेखा परीक्षकांकडून कारखान्याच्या नव्याने झालेल्या मूल्यांकनाची माहिती देण्यात आली. कार्यकारी संचालक संजय पाटील विशेष सभेतील प्रस्तावित विषयांची माहिती दिली. यावेळी कारखान्याची गाळप क्षमता ७ हजार ५०० मे. टन प्रतीदिनवरून दुप्पट म्हणजे, १५ हजार टन करण्याच्या ठराव सर्वसाधारण सभेत झाला. सध्या वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनीकडून चालविला जात आहे. त्यांचा करार संपल्यानंतर तो कारखाना संचालकांनी चालवावा, अशी सभासदांनी केली. त्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत, असे सांगण्यात आले.
कार्यकारी संजय पाटील यांनी साखर कारखान्याचे नव्याने मूल्यांकन केल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “कारखाना स्थापन झाला, तेव्हा तो मुख्य सांगली शहरापासून चार-पाच किलोमीटर दूर होता. त्या वेळचे मूल्यांकन कमी होते. बदलत्या काळानुसार लेखा परीक्षकांकडून नव्याने मूल्यांकन करून घेतले आहे. त्यामुळे कारखाना विस्तारीकरणासाठी भांडवलाची गरज लागेल, तेव्हा बँकांकडून जादा कर्ज घेणे शक्य होईल. उपाध्यक्ष बी. डी. पाटील म्हणाले, “डिस्टिलरीची दररोजची क्षमता ४५ हजार लिटर आहे. गाळप क्षमता वाढविल्यानंतर या प्रकल्पाचा विस्तार दररोज १ लाख ५० हजार लिटर क्षमतेपर्यंत नियोजित आहे. सभासद पांडुरंग पाटील, बजरंग पाटील यांच्यासह काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. हर्षवर्धन पाटील, दिनकर साळुंखे, दौलतराव शिंदे, प्रा. सिकंदर जमादार, शिवाजी कदम, तानाजी पाटील, संजय पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, विशाल चौगुले, यशवंतराव पाटील, गणपतराव सावंत पाटील आदी उपस्थित होते. अमित पाटील यांनी आभार मानले.


















