सांगली : गुळाची बाजारपेठ म्हणून सांगलीचे नाव फार आधीपासूनच प्रसिध्द आहे. मार्केट यार्डात रोजच्या रोज गुळाचे सौदे होतात. त्यामुळे गुळाची आवक आणि जावक रोजच्या रोज मुबलक होत असल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. दररोज ३०० ते ४०० टन गुळाची आवक होत आहे. श्रावण आणि सणावाराला गुळाची मागणी दुपटीने वाढली आहे. यंदा नागपंचमीसाठी चिक्की गुळाला चांगली मागणी होती. आता सणांचा महिना सुरू झाल्यामुळे सध्या मोदक गुळाची मागणी वाढत आहे. गौरी-गणपतीच्या काळात चिक्की गूळ, केशरी गूळ अधिक वापरला जातो. त्यामुळे मागणी तिप्पट वाढते. मागणी आणि दर आता दिवाळीपर्यंत वाढतच राहणार, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या सांगलीच्या बाजारात येणारा नव्वद टक्के गूळ कर्नाटकातील रायबाग तालुक्यातून येतो. कर्नाटकात पाऊस वाढल्यामुळे गुळाच्या वाहतुकीस काहीसे अडथळे येत आहेत. तर हवेतील आर्द्रतेमुळे गुळाच्या साठवणुकीतही अडचणी येत आहेत. सध्या ग्राहकांकडून केशरी आणि रसायनविरहित गुळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे पाव, अर्धा किलो, एक किलो गुळाच्या ढेप बनवल्या जातात. किराणा दुकानदारांकडून ५, १०, ३० किलोच्या ढेपींची मागणी वाढत आहे. सौद्यामध्ये गुळाचा दर ४४-४५ रुपये आहे, तर किरकोळ विक्री दर ५०-५५ रुपये आहे. पावसाळ्यापासून महाराष्ट्रासह इतरही राज्यातून गुळाची मागणी वाढते. दर रोज गुळ वाहतूक सांगली ते मुंबई आणि गुजरातकडे होते. सेंद्रिय गुळाबरोबर ब्रँडेड गुळालाही ग्राहकांची पसंती आहे.