सांगली : कुंडल (ता. पलूस) येथे ‘रोजगार हमी योजने’च्या उपजिल्हाधिकारी विजया यादव यांनी ‘ऊस तिथे नारळ’ या रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यादव यांच्या हस्ते विजय जाधव, बाबूराव जाधव या शेतकऱ्याच्या शेतात नारळाचे झाड लावण्यात आले. अधिकाऱ्यांनी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या व अधिकाधिक शेतकरी सहभागी होतील, यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. शेतकरी वर्गाने आपल्या उत्पादनात वाढ होण्यासाठी या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक नारळ दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. रोजगार हमी योजनेतील तालुक्यातील कामांचा आढावा घेताना विजया यादव यांनी विविध उपक्रमंचा आढावा घेतला. शेतकरी पांडुरंग पवार यांच्या शेतात जलतारा योजनेचा प्रारंभ यादव यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी प्रकाश कांबळे, तांत्रिक अधिकारी सुजय आवटी, मंडल कृषी अधिकारी संजय खारगे, सहाय्यक कृषी अधिकारी गीतांजली रकटे, संतोष चव्हाण, रोजगार हमी विभागाचे कर्मचारी विजय निकम व नितीन केंगार, शेतकरी जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.