सांगली : जिल्हा बँकेच्या थकीत कर्जासाठी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व कारखान्याची सर्व मालमत्ता जिल्हा बँकेने ‘सिक्युरीटायझेशन ॲक्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. बँकेने थकबाकी वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना दत्त इंडिया कंपनीला चालवण्यास दिला. मात्र, गेली दोन वर्षे दत्त इंडिया कंपनीने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. थकीत ५८ कोटींच्या कर्जापोटी कारखान्याची चार एकर जमीन विक्री करून कर्ज वसूल करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
दत्त इंडिया कंपनीने कर्ज न भरल्याने बँकेने करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याची नोटीस कंपनीला दिली आहे. बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात कारखान्याकडील थकबाकी वसूल करण्यासाठी हा कारखाना दत्त इंडिया कंपनीला दहा वर्षे मुदतीने चालवण्यात दिला आहे. त्यावेळी ‘दत्ता इंडिया’ कडून ६० कोटी रुपयांची अनामतही बँकेने घेतली. मात्र यातील ३० कोटी रुपये कारखान्याची काही देणी देण्यास परत देण्यात आली. तर ३० कोटी रुपये बँकेने कारखान्याच्या कर्जाला जमा करून घेतले. त्यामुळे आता जिल्हा बँकेकडे अनामत रक्कम शिल्लक नाही. कारखान्याची जमीन विक्री करून ५८ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. याला बँकेच्या संचालक मंडळाने मान्यता दिली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगीतले. कारखान्यावरील वसंतदादांच्या पुतळ्याशेजारी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. त्याला लागून रिकामी असलेली ही चार एकर जमीन असून ती बिगरशेती आहे. त्यामुळे या जमिनीला चांगला भाव येण्याची शक्यता आहे.