सांगली : वसंतदादा कारखान्याच्या थकीत कर्जप्रश्नी जिल्हा बँकेची दत्त इंडिया कंपनीला नोटीस

सांगली : दत्त इंडिया कंपनीने आतापर्यंत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे जिल्हा बँकेकडील थकीत कर्ज ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या कर्जापोटी कंपनीने एकही रुपया जिल्हा बँकेकडे भरलेला नाही. जिल्हा बँकेने कंपनी व कारखान्यास वारंवार याबाबत कळवूनही थकीत कर्ज न भरल्याने अखेर बँकेने कडक भूमिका घेत दत्त इंडिया कंपनीला दुसरी नोटीस बजावली आहे. मुद्दल ४० कोटी व व्याजाचे १४ कोटी असे ५४ कोटी रुपये थकीत आहेत. ही थकीत रक्कम तातडीने भरण्याची नोटीस जिल्हा बँकेने दत्त इंडियाला दिली आहे. सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी ही माहिती दिली.

कारखान्याच्या कर्जापोटी जिल्हा बँकेकडे गेल्या तीन वर्षांत दत्त इंडिया कंपनीने एक रुपयाही भरलेला नाही. त्यामुळे कारखान्याचे व्याजासह ५४ कोटी रुपये थकीत आहेत. थकीत रक्कम तातडीने भरण्याची नोटीस दिली आहे, अशी माहिती थकबाकी वेळेत न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे असे ते म्हणाले. कारखान्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने या कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता सिक्युरिटायझेशन अॅक्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. कारखाना चालवण्यासाठी जिल्हा बँकेने निविदा मागवल्या होत्या. यात दत्त इंडिया कंपनीने प्रति टन सर्वाधिक दर भरल्याने कंपनीला दहा वर्षांच्या मुदतीने कारखाना चालवण्यास दिला गेला. गेली आठ वर्षे वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनी चालवत आहे. दरम्यान, कंपनीने पैसे भरण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here