सांगली : सांगली जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानासाठी ९,००० रुपये अनुदान देण्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केली. एआय तंत्रात सॅटेलाईट मॅपिंगमुळे शेतातील मातीत असलेली अन्नद्रव्ये, ओलावा, वाफसा, तापमान, पिकांना पाण्याची गरज, पाण्याचे बाष्पीभवन याची अचूक माहिती मिळते. पिकांवर रोग व किडींच्या प्रादुर्भावाची सुरुवात होताच त्याचीही सूचना दिली जाते. तंत्रज्ञानाने पाण्याचा किमान ४० टक्के व खतांचा ३० टक्के वापर कमी होऊन पीक उत्पादनात ४० टक्के वाढ होऊ शकते असे नाईक यांनी सांगितले.
बँकेचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञानासाठी २५ हजार रुपये खर्च असून, त्यापैकी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ९ हजार २५० रुपये, साखर कारखान्यांकडून सहा हजार ७५० रुपये अनुदान दिले जाते. ९ हजार रुपये जिल्हा बँक अनुदान म्हणून देणार आहे. एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ऊस पीक, पाणी, खते, रोगांच्या प्रादुर्भावाबाबत माहिती मिळणार आहे. तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणारी शेती करता येणार आहे. ऊस शेतीमध्ये जगामधील पहिल्या मशीन लर्निंगचा वापर करून ३० टक्क्यापर्यंत ऊस उत्पादन वाढविले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, संचालक मोहनराव कदम, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, सुरेश पाटील, अमोल बाबर, तानाजी पाटील, वैभव शिंदे, राहुल महाडिक, बी. एस. पाटील, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, रामचंद्र सरगर, अनिता सगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते.