सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाचा गळीत हंगाम २०२४ -२५ साठीचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी कारखान्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री निमुबेन बांभानिया, माजी केंद्रीय सुरेश प्रभू, हरियाणाचे सहकारमंत्री अरविंद कुमार शर्मा, साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे प्रमुख उपस्थित होते.
नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ या शिखर संस्थेमार्फत साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे कारखान्यांचा अभ्यास केला जातो. यातीलच एक उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार आहे. कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय पातळीवरील ५, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे १० तसेच महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण ४, गार्डन क्लब १, बॉयलर असोसिएशन १, को-जनरेशन असोसिएशन ३ अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याची कामगिरी दिवसेंदिवस प्रगतिपथावर आहे. राष्ट्रीय साखर संघाचा गळीत हंगाम २०२४ – २५ साठीचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याचे श्रेय कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, कारखान्याचे सभासद, शेतकरी बंधू यांचे आहे.











