सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात ऊसदरासाठी स्वाभिमानीसह विविध संघटनांचे आंदोलन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने सोनहिरा कारखाना कार्यस्थळी संचालक मंडळाची बैठक घेण्यात झाली. यात साडेतीन हजार रुपये दर देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
ते म्हणाले, हे पैसे शेतकऱ्यांना एकरकमी द्यायचे याबाबतचा निर्णय लवकरच संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत होईल. कारखान्याने आतापर्यंत सर्व हंगामांत शेतकऱ्यांना उत्तम दर दिला आहे. वेळेत पैसे दिले आहेत. शिवाय, कारखान्याने आजपर्यंत राज्य व देश पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. देशातील सर्वोत्तम कारखाना ठरला आहे. यापुढेही शेतकरीहित जोपासत कारखाना प्रगती करेल. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी, संचालक रघुनाथ कदम, डॉ. शांताराम कदम, सयाजी धनवडे, पी. सी. जाधव, पंढरीनाथ घाडगे, बापूसो पाटील, शिवाजी गडळे, जगन्नाथ माळी, कार्यकारी संचालक शरद कदम व संचालक उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा म्हणाले की, ‘सोनहिरा’ची एफआरपी ३४६३.१४ रुपये आहे. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगलीतील कारखानदारांनी एफआरपी अधिक १०० प्रमाणे पहिला हप्ता दिला पाहिजे. हा दरही एकरकमी नाही. आम्हाला हा दर अमान्य असून शेतकऱ्यांची ही दिशाभूल आहे. अद्यापही ६३ रुपये १४ पैसे देणे आहे. ते त्यांनी तत्काळ जाहीर करावे, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल. लवकरच जिल्ह्यातील आंदोलनाची सुरुवात डॉ. पतंगराव कदम स्मारक आणि डी. बापू लाड यांच्या स्मारकापासून सुरू करण्यात येईल.












