सांगली : ऊस शेतीत पाचट ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल, जमिनीच्या सुपीकतेत वाढ

सांगली: काही वर्षांपूर्वी साधारणपणे ऊस गळितास गेला की पाचट पेटविण्यावर भर असायचा. युवा पिढी शेतीत राबू लागली. जमिनीच्या सुपीकतेचे महत्त्व कळाले आणि लोक हळूहळू पाचट ठेवण्याकडे वळू लागले. साखर कारखान्यांनीही यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि यामध्ये वाढ झाली. पाचट ठेवण्यासाठी मदत होते. पश्चिम भागात पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे या परिसरासह जिल्ह्यात पाच ते दहा टक्के फक्त शेतकरी पाचट शेतात ठेवताना दिसतात. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस शेतीत पाचट आच्छादन करण्यावर भर दिला आहे.

ऊस शेतीमध्ये मजुरांची टंचाई, वाढता उत्पादन खर्च, उसाचे घटते उत्पादन व पाण्याची टंचाई पाहता शेतकरी ऊस तुटल्यानंतर पाचट ठेवण्यावर भर देत आहेत. यातच यांत्रिकीकरण वाढत असल्याने पाचट आच्छादनाला मदत होत आहे. याबाबत क्रांती साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव म्हणाले की, कुंडलच्या क्रांती कारखान्यातर्फे पाचट व्यवस्थापनासाठी एकरी तीन हजार, बुडखे तासणीसाठी दोन हजार रुपये अनुदान व पाचट कुजविण्यासाठी दोन सुपर फॉस्फेट व एक युरिया ५० टक्के अनुदानावर दिले जाते. तर कारंदवाडीचे प्रगतशील शेतकरी सुरेश कबाडे यांनी सांगितले की, गेली २० वर्षे पाचट पेटवित नाही. सेंद्रिय कर्ब वाढीसाठी पाचट कुट्टी आणि हिरवळीची खते यांना प्राधान्य देतो. त्याचा ऊस शेतीला फायदा होत आहे. भांगलण, मशागत खर्चात ५० टक्के बचत होत असून शेतात ओलाव्याचे प्रमाण चांगले राहते. एक एकर क्षेत्रातून चार ते पाच टन पाचट मिळते. दोन ते तीन टन सेंद्रिय खत खोडवा पिकाला उपलब्ध होते. उसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनाने वाढ होते, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here