सांगली : पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी उसाला दीड वर्षानंतरही तोड मिळालेली नाही. तोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांची ऊस तोडणीच्या नावाखाली लूट सुरू आहे. तोडणी मजूर शेतकऱ्यांकडून एकरी ४,००० ते ५,००० रुपयांची मागणी करत आहेत. हे पैसे देऊनही जेवण, चहापाणी याचा खर्च वेगळा करावा लागतो आहे. वाहनचालकांना ‘एंट्री’ द्यावी लागते. ऊस तोडणी यंत्रधारकांकडूनही होणारी लूट वेगळीच आहे. शेतकऱ्यांना लुबाडले जात असल्याचे समजत असूनही साखर कारखानदार दुर्लक्ष करीत आहेत. आधी निसर्गाच्या तडाख्यात ऊस पिकाची हानी झाली, आता तोडणीवेळी लूटले जात असल्याची बिकट अवस्था आहे.
शेतकऱ्यांची अशी लूट सुरू असल्याी वस्तुस्थिती साखर कारखानदारांपासून सर्वांना माहीत आहे. तरीही ही लूट थांबविण्यासाठी कोणीही कारखानदार किंवा लोकप्रतिनिधी, विविध विचारांच्या शेतकरी संघटना व त्यांचे नेते पुढे येत नाहीत. त्यामुळे या लुटीला त्यांचा पाठिंबा आहे का, असा सवाल शेतकरी करीत आहेत. तालुक्यात सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असला तरी ज्याचा वशीला, त्याचाच ऊस नेला जात आहे. यावर्षी सतत सहा ते सात महिने पाऊस सुरू राहिला. उसाची वाढ खुंटली. यातून उसाला कमी उतारा आहे. कारखान्यांकडे ऊस नोंद असूनही, तोडणी मजूर विविध कारणे सांगून ऊस तोडायला नकार देत आहेत. यंत्राद्वारे तोडणी होत आहे. ही यंत्रणा कमी पडत आहे. आणि त्यांच्याकडूनही लूट सुरू असल्याचे चित्र परिसरात आहे.

















