सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे ऊस पिकावरील पाण्याचा ताण कमी झाला आहे. पर्यायाने उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे. चांदोली व मोरणा धरण व इतर साठवण तलाव ही वेळेआधी भरल्यामुळे व आताच्या पावसाने पूरपरिस्थिती अथवा ओला दुष्काळ नाकारता येणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील म्हणाले की, सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. पिकांची अवस्था चांगली आहे. मात्र, येत्या काळात पावसाचा जोर वाढला तर पूर येऊन ऊस उत्पादनात घट होण्याचा धोका संभवतो. ‘ओला दुष्काळ’ म्हणण्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शिराळा तालुक्यातील उसाचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.
याबाबत पाटील यांनी सांगितले की, अती पावसाचा शिराळा तालुक्यात आडसाली ऊस लागणीवर परिणाम झाला. काही शेतकऱ्यांनी सरी सोडली व ते रोप लागणीकडे वळलेत. मात्र जादा पावसात कांडी लागणीची उगवण अपेक्षित होत नाही. आडसाली लागणीचे प्रमाण घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होऊन तालुक्यातील ऊसाचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. यंदा उशिरा झालेल्या लागणी बहुतांशी जानेवारी, फेब्रुवारी, महिन्यात झाल्या. या लागणीचे मोठ्या भरणीचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे उशिरा लागणीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, तालुक्याच्या उत्तर विभागात मे महिन्यात पाणी कमी पडते. उसाची वाढ थांबून उत्पन्न घटते. परंतु या भागात वेळेआधी सुरू झालेला पाऊस वरदान ठरला आहे.