सांगली : ऊसतोडणी मजूर पुरवतो, असे सांगून सुमारे चार लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप शंकर पाटील (रा. भादोले, ता. हातकणंगले) याच्या विरोधात दिनकर रमेश पाटील (रा. दह्यारी) यांनी कुंडल पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. कुंडल पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनकर पाटील यांच्याकडून २५ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत संशयित संदीप पाटील याने ऊसतोडणी मजूर पुरवतो म्हणून ४ लाख ३६ हजार रुपये घेतले. मात्र, त्याने मजूर न पुरवता फसवणूक केल्याचे उघड झाले.
या व्यवहारानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने टाळाटाळ केली. त्यानंतर पाटील यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेची गंभीर दखल घेत कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडल पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीच्या हंगामात मजूर पुरवठ्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहे.


