सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने क्षारपड निर्मूलन- निचरा प्रणाली एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ करणे, या विषयावर ऊसपीक परिसंवाद क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी स्मारकात झाला. यावेळी क्षारपड निर्मूलन – निचरा प्रणाली या विषयावर श्रीशैल हेगाण्णा यांनी व कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) या विषयावर कृषी विशेषज्ञ डॉ. तुषार जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस आणि क्षारपड निचरा निर्मूलन प्रणाली राबवून जमिनी पिकाखाली आणण्यासाठी कारखाना पुढाकार घेईल, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली.
कार्यशाळेत वीरधवल नायकवडी यांनी कारखाना कार्यक्षेत्रामधील सर्व गावांतील क्षारपड क्षेत्राची माहिती दिली. श्रीशैल हेगाण्णा म्हणाले, क्षारपड निर्मूलन तंत्रज्ञानामध्ये यापूर्वी असणाऱ्या कमतरता त्रुटी आता दुरुस्त झाल्या आहेत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आहे. माती परीक्षण करूनच आवश्यक खतांची मात्रा द्यावी. डॉ. तुषार जाधव यांनी जमिनीची गुणवत्ता प्रत, जमिनीचे रासायनिक गुणधर्म तपासणी व सुधारणेसाठी एआय तंत्रज्ञान मदत करते असे सांगितले. रामचंद्र भाडळकर, संचालक गौरव नायकवडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेती अधिकारी सर्जेराव वावरे यांनी आभार मानले.