सांगली : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालय नामकरण सोहळ्याची अचूक वेळ साधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे माणगंगा कारखान्याची व्यथा मांडली. पाटील यांनीही पालकमंत्री या नात्याने जबाबदारी घेऊन कारखाना सुरू करण्याची ग्वाही दिली. माणगंगेचा तिढा सोडवून कारखान्याचे धुराडे पेटण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
माणगंगा साखर कारखाना २०१८ पासून बंद आहे. जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी कारखाना ताब्यात घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी कारखान्याची निवडणूक झाली. सत्ताधारी देशमुख गटाने शेवटच्या क्षणी माघार घेतली. शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांची सत्ता आली. त्यांनी बँकेकडून ‘लिव्ह अँड अॅक्ट’ कायद्यानुसार कारखाना चालवण्यासाठी घेतला. अनेक वर्षे कारखाना बंद असल्याने दुरुस्ती करून चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. त्यामुळे कारखाना बंदच राहिला.
टेंभूचे पाणी तालुक्यात अपवाद वगळता बहुतांश भागांत पोहोचलेय. त्यामुळे फळबागा आणि बागायती क्षेत्रात वाढ झाली. उसाचे क्षेत्रही वाढले. मात्र, ऊस गाळपाचा प्रश्न असल्याने ऊसाला ब्रेक लागला. तालुक्यातील उसावर कारखाना सक्षमपणे चालू शकतो. एवढा ऊस उपलब्ध होऊ शकतो. मात्र, माणगंगा बंद असल्याने उत्पादकासमोर गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमरसिंह देशमुख यांनी सर्व देणी स्वीकारून जिल्हा बँकेकडून कारखाना विकत घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली होती. मात्र, काही अडचणीमुळे बँकेने कारखान्याची विक्री काढलेली नाही. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कारखाना बचाव समिती स्थापन करून कारखाना सहकारीच ठेवण्यासाठी लढा उभारला आहे. परिणामी, बँकेने कारखाना विक्रीचे पाऊल टाकले नाही.