सांगली : ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा परवाना देण्याची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी

सांगली : परिवहन विभागाकडून दहा वर्षांपूर्वी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉली चालकास दोन्हीचा एकत्रित परवाना मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र फक्त ट्रॅक्टरचाच परवाना मिळत आहे. इतर राज्यांमध्ये ट्रॅक्टर व ट्रॉलीचा एकत्रित परवाना मिळतो. तशाच पद्धतीने कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास पूर्वीप्रमाणे ट्रॅक्टर व ट्रॉलीचा एकत्रित परवाना द्या, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाने सह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी बाळासाहेब पाटील, समीर पाटील, अरुण पाटील, अनिल पाटील, माणिक आवटी, राजेंद्र मासुले, विपुल दळवी, शरद मासुले, संजू आलदर उपस्थित होते.

याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरटीओकडून ट्रॅक्टरसह ट्रॉलीचीही नोंदणी केली जाते. ट्रॉलीसाठी स्वतंत्र विमाही घ्यावा लागतो. मात्र ट्रॉलीखाली सापडून अपघात झाल्यास विमा कंपनी भरपाई देत नाही. विमा कंपनी वाहन चालकाचा ट्रॉली चालविण्याचा परवाना मागते. ट्रॉलीची आरटीओकडे नोंदणी असते. विमा कंपनीकडून विमा घेतलेला असतो. त्यामुळे ट्रॉलीचा अपघात झाल्यास विमा कंपनीस नुकसान भरपाई देणे बंधनकारक असताना विमा कंपनी ट्रॉलीचा परवाना नाही, या कारणास्तव विमा नाकारला जातो. त्याचा नाहक त्रास ट्रॅक्टर वाहन चालक व मालकास होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here