सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याच्या वजन काट्याची व वाहनांची भरारी पथकाने तपासणी केली. त्यात वजन काटा निर्दोष आढळून आला. भरारी पथकाने अचानक भेट दिली. यावेळी पथकाने वजन होऊन गेलेल्या वाहनांची माहिती घेतली. त्या वाहनांना परत बोलावून पुन्हा वजने तपासली. तसेच वजनासाठी आलेल्या वाहनांची तपासणीही केली.
तपासणी अनुसार वजन काट्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही. भरारी पथकाने तसा लेखी अहवाल कारखान्यास दिला. पथकाने यावेळी कारखान्यास काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. निवासी नायब तहसीलदार विठ्ठल पाटील, सहकारी संस्थां चे लेखापरीक्षक रमेश व्हनखंडे, वैद्यमापन निरीक्षक योगेश अग्रवाल, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, पोलिस हवालदार बाजीराव भोसले यांनी वजन काट्याचे परीक्षण केले. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील, खरेदी अधिकारी राजेंद्र पाटील, गाडीतळ निरीक्षक शंकर येवले, संगणक पर्यवेक्षक जयवंत गुरव उपस्थित होते.

















