सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी कारखान्यातर्फे खोडवा पिकासाठी ऊस विकास योजना जाहीर केली. गाळप हंगाम सन २०२५-२६ लागण तुटल्यानंतर, खोडवा पिकात पाचट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाचट कुजवण्यासाठी ५० टक्के अनुदानावर खते व रोग नियंत्रणासाठी औषधे पुरवठा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लागण तुटलेनंतर पाचट व्यवस्थापनासाठी एकरी ३,००० रुपये, बुडके तासण्यासाठी २००० रुपये असे एकूण ५,००० रुपयांचे रोख अर्थसाहाय्य केले जाणार आहे. फवारणीसाठी पन्नास टक्के अनुदानावर डायमिथोएट २५० मिली, बाविस्टीन १०० ग्रॅम व पाचट कुजणेसाठी ५० टक्के अनुदानावर सुपर फॉस्फेट १०० किलो, युरिया ५० किलो दिले जाणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, शेतकरी लागण केलेल्या उसाचे काटेकोर व्यवस्थापन करतात, मात्र खोडवा पिकाकडे मात्र दुर्लक्ष होते. लागणीपेक्षा खोडवा पिकाचे एकरी उत्पादन जादा निघणे अपेक्षित असते, प्रत्यक्षात मात्र एकरी १० ते १५ मे. टनाच्या फरकाने खोडव्याचे उत्पादन कमी मिळते. तसे होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निविष्ठांशिवाय उधारीने तुटाळी सांधणेसाठी ऊस रोपे, एकरी २५ हजार रुपयांची रासायनिक मुख्य व सुक्ष्म खते, ३ हजार रुपयांची आळवणी- फवारणीची जैविक, विद्राव्य खते, ३ हजार रुपयांची तणनाशक व रासायनिक औषधे ऊस विकास योजनेतून उधारीने देण्यात येणार आहेत. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचाल,क आमदार अरुण लाड, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, सचिव, शेती अधिकारी व ऊस विकास अधिकारी उपस्थित होते.


















