सांगली : क्रांती साखर कारखान्याला गळीत हंगामात ‘निडवा’ उसाचा पुरवठा करणाऱ्या ७७८ शेतकऱ्यांना २१.२८ लाखांचे अनुदान देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रती टन १०० रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी, २०२३ मध्ये अवर्षणामुळे कठीण परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी निडवा ऊस पीक घेतले. त्या शेतकऱ्यांना कारखान्याने प्रतिटन १०० अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देण्याचे धोरण जाहीर केले होते. या धोरणाचा लाभ ३५८ हेक्टर क्षेत्रावर निडवा ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. यामुळे कारखान्याला २१ हजार २७८ टन अधिक ऊस उपलब्ध झाला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, कारखान्याने निडवा उसास खोडवा पिकासारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. कमी पाण्यावर ऊस जगविण्यासाठी पाचट अभियान आणि निडवा व्यवस्थापन अभियान राबविले. निडवा ऊस योग्य व्यवस्थापनाने घेतल्यास अधिक उत्पादन व निव्वळ नफा मिळवता येतो. यावेळी कारखान्याचे दिगंबर पाटील, जयप्रकाश साळुंखे, पी. एस. माळी, दिलीप थोरबोले, वैभव पवार, संजय पवार, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, सुभाष वडेर, अशोक विभूते, अनिल पवार, सुकुमार पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सचिव विरेंद्र देशमुख, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर व चिफ अकौंटंट परबतराव यादव उपस्थित होते.