सांगली : ऊस तोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्यास अटक

सांगली : खटाव (ता. पलूस) येथील ऊस तोडणी वाहतूकदारास मजूर पुरवितो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोडणी मुकादमाच्या भिलवडी पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या. राजूभाई गणपतभाई पवार (रावचोंड, ता. अहवा, जि. डांग, गुजरात) असे अटक झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खटाव येथील ऊसतोडणी वाहतूकदार नितीन राजाराम ढेरे व श्रीकृष्ण शिवलिंग पाटील यांनी २०२३-२४ या गळीत हंगामासाठी कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याबरोबर करार केला होता. राजूभाई पवार व त्याचा सहकारी मोहनभाई हरजसिंगभाई सूर्यवंशी (लिंगा, जि. डांग, गुजरात) हे १५ कोयते (३० मजूर) पुरविणार होते.

यासाठी त्यांना रोख व आरटीजीएसद्वारे ८ लाख ९ हजार रुपये वेळोवेळी दिले; मात्र त्याने मजूर पुरविले नाहीत. दिलेली रक्कमही परत केली नाही. त्यांची फसवणूक केली. याबाबत ढेरे यांनी २७ जून रोजी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भिलवडी ठाण्याचे हवालदार अरविंद कोळी व रामचंद्र गायकवाड यांच्या पथकाने तक्रारीवरून गुजरातमधील रावचोंड येथे जाऊन संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here