सांगली : ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा आंदोलन सुरू, पहिल्या उचलीबाबत उत्सुकता

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. यातील केवळ ‘दालमिया शुगर कोकरुड यांनी पहिली उचल ३ हजार ५३७ रुपये तर एन. डी. पाटील शुगरने ३ हजार ५४० रुपये दर जाहीर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या गाळप हंगामासाठी पहिली उचल म्हणून ज्यांची एफआरपी ३४०० रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी ३५०० रुपये आणि ज्यांची एफआरपी जास्त आहे, त्यांनी एफआरपी अधिक १०० रुपयांप्रमाणे पहिली उचल जाहीर करावी,’ अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संघटनेने १२ नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. सोनहिरा व क्रांती कारखाना परिसरात आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूरच्या कारखान्याला उसाला दर द्यायला जमते, तर सांगलीतील कारखानदारांना का जमत नाही, असा आक्षेप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. संघटनेने ‘सोनहिरा’ प्रशासनाने संघटनेशी संपर्क साधला असून ‘क्रांती’कडूनही तशीच अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संघटनेच्या आवाहनाला शेतकरी व वाहतूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. याबाबत संघटनेचे संदीप राजोबा म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनीसुद्धा एफआरपीवर जादा दर देता येणे शक्य नाही, असे सांगितले. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा व्यावहारिक भूमिका घेऊन मागणी कमी केली. आता सांगली जिल्ह्यातही साखर कारखानदारसुद्धा दोन पावले पुढे आले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here