सांगली : राजारामबापू कारखान्याने गेल्या ५०-५५ वर्षांत उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम जपली. नेहमी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले. कारखान्याचा गेला गळीत हंगाम हा उसाच्या टंचाईमुळे १०० दिवसांत संपला. त्यामुळे काही आर्थिक प्रश्न निर्माण झालेत. मात्र, यंदा चांगले गाळप सुरू आहे. साखरेचा उतारा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त राहू शकतो, असे गृहीत धरून साखराळे, वाटेगाव- सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गाळपास येणाऱ्या ऊसास प्रतिटन रुपये ३५०० दर निश्चित केला आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी दिली.
माहुली म्हणाले की, केंद्र सरकार काही दिवसात साखरेचा किमान विक्रीचा दर वाढविणार, अशी अपेक्षा आहे. केंद्राने गेल्या तीन वर्षात इथेनॉलचे दर वाढविले नाहीत. येत्या काही दिवसात इथेनॉलचे दरही एफआरपीच्या प्रमाणात वाढविणे अपेक्षित आहे. राजारामबापू कारखान्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळविलेत. गेल्या काही वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेताच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवत आहोत. कारखान्याने गळीत हंगाम सन २०२५-२६ मध्ये गाळप वाढविण्याचे नियोजन केले आहे. ऊस उत्पादकांनी ऊस राजारामबापू सहकारी साखर कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे.


















