इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माणिकवाडी, महादेववाडी या गावातून सभासद संपर्क दौरा सुरू केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचे एकरी उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. पूर्वी प्रतिहेक्टरी १०५ टन ऊसाचे उत्पादन येत होते. आता ते ८२ टनावर आले आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या योजनांचा लाभ घेऊन आपले एकरी उत्पादन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. या दौऱ्यात माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, संचालक अतुल पाटील, सचिव डी.एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील, गट अधिकारी नितीन पाटील सहभागी झाले होते.
सभासद संपर्क दौऱ्यात अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दिले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान व विविध योजनांची माहिती दिली. सभासदांच्या आरोग्य व आपल्या मुलांच्या शिक्षणा साठी विविध सोई-सुविधा सुरू केल्या आहेत असे त्यांनी सांगितले. प्रतीक पाटील म्हणाले की, पूर्वी कारखाना १६० दिवस चालत होता, तो १०० दिवसांवर आला आहे. आपणास कमी खर्चात ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. यावेळी देवराज पाटील, संचालक अतुल पाटील, वाटेगाव संयुक्त पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर, राजारामबापू बँकेचे संचालक नामदेव मोहिते, सरपंच वसंत शिंदे, दिनकर शिंदे, शंकरराव जाधव आदीनी संवाद साधला.