सांगली : वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) च्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी सरचिटणीस तानाजीराव खराडे, कार्याध्यक्ष मोहनराव शिंदे, कामगार संचालक विकास पवार, मनोहर सन्मुख, खजिनदार सचिन कोकाटे प्रमुख उपस्थित होते. सभेत वाळवा तालुका राष्ट्रीय साखर संघ (इंटक) चे अध्यक्ष व राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सध्या साखर उद्योग एका संक्रमण काळातून जात असून बदलत्या परिस्थितीत कामगार संघटनेची ताकद वाढविणे आवश्यक आहे. आपले न्याय्य हक्क मिळवित आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकजुटीने संघटनेच्या पाठीशी राहा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
तात्यासाहेब काळे व सहकाऱ्यांनी कमी वेळेत १० टक्के पगारवाढीचा प्रश्न मार्गी लावला. ज्या साखर कारखान्यांनी ही पगारवाढ लागू केलेली नाही, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते राज्याचा दौरा करीत आहेत, असे ते म्हणाले. तानाजीराव खराडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. लालासाहेब वाटेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. सोसायटी संचालक भीमराव मचाले, सदाशिव पाटील, सुनील यादव, सुनील पाटील, विलास थोरात, दिलीप मोहिते यांच्यासह कामगारांनी चर्चेत सहभाग घेतला. कामगार संचालक मनोहर सन्मुख यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. खजिनदार सचिन कोकाटे यांनी संघटनेचा जमाखर्च मांडला. कामगार संचालक विकास पवार यांनी आभार मानले. उपाध्यक्ष सुदाम पाटील, सरचिटणीस संजय शेळके, योगेश पवार, दिलीप पाटील, अशोक खोत उपस्थित होते.
















