तुंग : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) विभागाकडून फक्त ट्रॅक्टरचा परवाना मिळतो आहे. अन्य राज्यांत ट्रॅक्टर व ट्रॉली असा दोन्हींचा एकत्रित परवाना दिला जातो. साधारण १० वर्षांपूर्वी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉली चालकास एकत्रित परवाना दिला जात असे. ट्रॅक्टरबरोबरच ‘आरटीओ’कडून ट्रॉलीचीही नोंदणी केली जाते. ट्रॉलीसाठी स्वतंत्र विमाही घ्यावा लागतो. त्यामुळे आरटीओंनी एकत्र परवाना द्यावा अशी मागणी यासंदर्भात स्वतंत्र भारत पक्षाने केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (सांगली) यांची भेट घेतली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या वेळी ट्रॉलीखाली एखादी व्यक्ती सापडून अपघात झाल्यास विमा कंपनी भरपाई देत नाही. विमा कंपनी वाहनचालकाचा ट्रॉली चालविण्याचा परवाना मागते. या संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, ते स्कूल ड्रायव्हिंगकडे बोट दाखवतात. ट्रॉलीचाही परवाना घेण्यास वाहनमालक व वाहनचालकांची तयारी असताना स्कूल ड्रायव्हिंगच्या नावाने नोंदणीकृत केलेल्या ट्रॉल्या नसल्यामुळे ट्रॉलीचा परवाना घेणे वाहनचालकास शक्य नाही. याचाच गैरफायदा विमा कंपनीवाले घेत आहेत. त्याचा नाहक त्रास ट्रॅक्टर वाहनचालक व मालकास होत आहे. संबंधितांनी योग्य ती कारवाई करून वाहनमालक-चालकास दिलासा द्यावा. अन्यथा, याप्रश्नी तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे बाळासो पाटील, समीर पाटील, अरुण पाटील, अनिल पाटील, माणिक आवटी, राजेंद्र मासुले, विपुल दळवी, शरद मासुले, संजू आलदर आदी उपस्थित होते.