सांगली : वसंतदादा कारखान्याचे कार्यक्षेत्र खानापूर, आटपाडी, जत तालुक्यात वाढवण्याचा ठराव मंजूर

सांगली : येथील वसंतदादा सहकारी शेतकरी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष बाळासो पाटील यांच्यासह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. साखर कारखाना भाड्याने न देता स्वतः अशी मागणी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, कामगार नेते प्रदीप शिंदे, मनोहर पाटील, महावीर बस्तवडे आदींसह सभासदांनी केली. त्यासाठी कारखान्याचे कार्यक्षेत्र खानापूर, आटपाडी, जत तालुक्यांपर्यंत वाढवण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी, अध्यक्ष विशाल पाटील यांनी कारखाना संचालक मंडळाने चालवावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, त्यासाठी तयारी करावी लागेल. त्यासाठी कार्यक्षेत्र वाढीचा ठराव करून तो मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे सांगितले.

खासदार पाटील म्हणाले, दत्त इंडिया कंपनीने कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. दत्त इंडिया कंपनीसोबत २०१७ ते २०२७ असा दहा वर्षांचा करार झाला आहे. दत्त इंडियाचा यंदाचा ९ वा गळीत हंगाम आहे. अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्र वाढवण्याबाबत ठराव करीत आहे. यावेळी बापूसो पाटील, प्रभाकर पाटील, गणपती कबाडगे, सुनील फराटे, राजू पाटील यांनी दत्त इंडियाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी सभेची नोटीस वाचन केले. कारखान्याच्या वजन काट्यावर सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. शंकांचे निरसन करण्याची मागणी सभासद प्रदीप पाटील, बजरंग पाटील यांनी केली. अध्यक्ष पाटील यांनी ‘काटा’ योग्यच असल्याचे ठासून सांगितले. सभासदांच्या शेअर्सची किंमत दहा हजार रुपयांवरून १५ हजार रुपये सहकार विभागाने केली आहे. सर्व सभासदांना दिवाळीपूर्वी प्रत्येकाच्या घरात साखर देण्याची व्यवस्था केली आहे असे अध्यक्षांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here