सांगली : जत तालुक्याच्या विकासात मानबिंदू ठरलेल्या आ. विश्वजित कदम आणि कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरु असणाऱ्या श्रीपती शुगरने २०२५-२६ च्या चौथ्या गळीत हंगामात अवघ्या ६२ दिवसात दोन लाख ५१ हजार साखर पोती उत्पादनाचा टप्पा पूर्ण केला आहे. जत येथील सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समस्येला तोंड द्यावे लागत होते. ही बाब लक्षात घेत राज्याचे माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांच्या स्वप्नातील कारखाना माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदम यांनी सुरू केला. यंदाचा हा चौथा गळीत हंगाम आहे. यावर्षी तालुक्यात उसाचे क्षेत्र देखील जास्त आहे. कारखाना सुरू झाल्यापासून दररोज चार ते साडेचार हजार मेट्रिक टनाने साखर उत्पादन केले जात आहे.
तालुक्यातील कारखाना परिसर, अथणी, संख, कुंभारी, जत, तासगाव, सांगोला, सलगरे, कवठेमहांकाळ या भागातून ऊस येथे येत आहे. यंदा कारखान्याने ३३०० रुपये हमीभाव दिला असून त्यापैकी ३२५० रुपये प्रमाणे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. यावर्षी कारखाना सुरू झाल्यापासून अवघ्या ६२ दिवसात दोन लाख ५१ हजार साखर पोत्यांचे उत्पादन करण्याचा विक्रम केला आहे. यावर्षी पाच लाख साखर पोत्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून श्रीपती शुगरने जत आणि कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. चांगला भाव, वेळेत बिले अदा करणे, काट्यात कसलीही तक्रार नाही. याशिवाय मार्गदर्शन शिबिरे, मेळावे, नवे तंत्रज्ञान याची सतत माहिती मिळत असल्याने श्रीपती शुगरवरचा विश्वास वाढला आहे. कारखान्याच्या या यशस्वी घोडदौडीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जोशी व शेती अधिकारी तसेच सर्व विभागाचे कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.

















